Friday, July 6, 2018

जिल्हा परिषदेमार्फत विशेष गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार - जिल्हा परिषद उपाध्यक्षा.सौ अर्चनाताई पाटील






उस्मानाबाद.दि.4:- स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत या वर्षी पासून विशेष गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील यांनी  आज केले .
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवार दि. 4 जुलै 2018 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील  बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, शिक्षणाधिकारी (प्रा) शिवाजी जाधव, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) सत्यवान सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, उध्दव साळवी, श्रीमती. उषाताई यरकळ, श्रीमती. अस्मिता कांबळे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार, गट शिक्षणाधिरी सर्वश्री. कल्याण सोनवणे, श्री. मोकाशे, श्रीमती. यमुनाबाई देशमुख, श्री. बनसोडे, श्रीमती. सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, वाढत्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत विशेष गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार असून यासाठी प्रत्येक शाळेचे वर्षभराचे अभ्यासक्रमाचे नियोजन केले जाणार आहे, त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला वेळापत्रक तयार करुन दिले जाणार असून त्याप्रमाणे शिकवण्यास सुरवात करण्यात येणार आहे. प्रत्येक पाठ शिकवण्याचा झाला की, त्यावर अधारित प्रश्न सोडवून घेतले जाणार आहेत. यासाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्यात येणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरते ग्रंथालय दोन महिण्यात सुरु करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना 10 वी, 12 वी नंतर पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन व्हावे म्हणुन त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन मेळावा घेण्यात येणार आहे, असे ही यावेळी सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेमध्ये अनुभवी शिक्षक असल्याने जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढत असून यावर्षी गतवर्षी पेक्षा चांगले यश जिल्हा परिषद शाळेनी मिळविले आहे. यावर्षी पासून जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना याचा क्रीडा गुणासाठी फायदा होईल. मायेची व कौतूकाची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडून इतर विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के प्रगत करणे, अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर आणणे, यासह शिक्षण विभागाच्या सर्व योजनांना बळकटी देवून गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी  श्री. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, उषाताई यरकळ, अस्मिाता कांबळे आदींनी  मनोगत व्यक्त केले.  यावेळी  जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 10 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 45 विद्यार्थ्यांचा, त्याचबरोबर शंभर टक्के निकाल असलेल्या तीन शाळेचा व 95 ते 100 टक्के पर्यंत निकाल असलेल्या तीन शाळेच्या मुख्याध्यापकांचा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या 32 विद्यार्थ्यांचा असे एकुण 83 सत्कार स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्रा) शिवाजी जाधव, आभार उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार यांनी मानले तर सुत्रसंचलन हनुमंत पडवळ यांनी केले. विस्तार अधिकारी श्री.लोमटे, श्री.घोलप, श्री.यरमुनवाड, श्री.वाघमारे, श्रीमती.कुंभार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी  विशेष परिश्रम घेतले.  यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
******



No comments:

Post a Comment