Sunday, December 23, 2018

ग्रंथदिंडीने वेधले उस्मानाबादकरांचे लक्ष




उस्मानाबाद, दि.22:-  पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे कन्या प्रशाला ते वैराग्यमहामेरू संत गोरोबाकाका साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत महापुरुषांच्या वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात आला. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा तथा स्वागताध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
टाळ, मृदंगाचा गजर करणारे पथक, विविध वेशभूषातील विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. या शिवाय विद्यार्थ्यांनी या दिंडीत विविध जनजागृतीपर घोषणा देत सामाजिक संदेश देण्याचे काम केले. यावेळी दिंडीत संतपरंपरा, उस्मानाबाद जिल्हा दर्शन, एकता बल, स्वच्छता मिशन, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण संस्कृती, आदी संदेश देणारे चित्ररथ सामिल करण्यात आले होते. ही दिंडी जिल्हा परिषद कन्या शाळेपासून संत गाडगेबाबा चौक, काळा मारूती चौक, ताजमहल टॉकीज, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे संमेलनस्थळी आली. यावेळी तेथे दिंडीचा समारेाप करण्यात आला.

मन सुदृढ करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे -आमदार राणाजगजितसिंह पाटील




उस्मानाबाद, दि.22:-मन सुदृढ करायचे असेल तर साहित्य महत्वाचे आहे, जग कसे आहे, चांगले काय आहे, हे साहित्यामुळे समजते. त्यामुळे जीवनात साहित्याचे स्थान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी येथे केले.
             जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्या बालकुमार साहित्य्‍ संमेलनाचे उद्‌घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कन्या प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. यावेळी पु. . देशपांडे विचारमंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागताध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, संमेलन अध्यक्ष कु.साक्षी तिगाडे, जेष्ठ साहित्य‍िक भास्कर चंदनशिव, राजेंद्र अत्रे, माधव गरड, बालाजी इंगळे, निर्मला मठपती, कमलताई नलावडे, रमेश चिल्ले, आशा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय देवळकर, संदिप मडके, ज्ञानेश्वर गीते, अस्मिता कांबळे, उषाताई यरकळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, डायटचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख,  उपशिक्षणाधिकारी कादर शेख आदीसह सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी तसेच जिल्हयातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. 
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की,  मुलांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी त्यांना साहित्य संमेलनासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. या संमेलनाच्या निमित्ताने शाळांमधूनच विद्यार्थ्यांना साहित्याचा अनुभव मिळणार आहे. साहित्य म्हणजे मनोरंजन नसून जीवन कसे चांगल्या पध्दतीने जगायचे हे साहित्य शिकवत असते.
ज्या शाळेतील मुलांची या संमेलनात निवड झाली आहे त्या शाळेला पाच हजार रुपयांचा पुस्तकांचा संच देण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
जेष्ठ साहित्यीक भास्कर चंदनशिव यावेळी म्हणाले की, सध्या संभ्रमाचे वातावरण असून माणूस माणसापासून दूरावतो आहे, अशा परिस्थितीत साहित्य  संमेलन आयोजन करणे ही काळाची गरज आहे. माणसाला माणूसकीप्रत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे साहित्य होय. साहित्य हा माणसाला माणसात आणणारा व्यवहार आहे. आई ही पहिली बालसाहित्य‍िक आहे ती लहान मुलांच्या रडण्या, बागडण्यापासून ते अंगाई गीतापर्यंत साहीत्य निर्माण करते. मुलांना व्यक्त होण्याची संधी या संमेलनामुळे मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ यामुळे उपलब्ध झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दिव्यांगांना तालुकास्तरावर अपंग प्रमाणपत्राचे वाटप, आदीसह विविध अभिनव उपक्रम राबवून ऐतिहासीक निर्णय घेणारी राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. यापुढेही शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविणार असून शिक्षकांनी ही ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, तांडा, वस्ती  शाळेतील मुलांचे उपजत गुण शोधण्यासाठी त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागूण शोधून त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी संमेलनाचे आयोजन केले आहे.  सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची ताकद साहित्यात असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गरुड झेप घ्यावी, त्याचबरोबर एखादे शिल्पचित्र  रेखाटले तर त्यातून मिळणारा आनंद द्विगुणीत अनुभव यावा, कल्पना शक्तीला फुलविण्याची ताकद साहित्यात असते.
तांडा, वस्तीवरील गरिब मुलांचे भवितव्य हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी हे साहित्य संमेलन असून बाल साहित्यातून त्यांना काय पाहिजे हे मांडता यावे यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संमेलनाध्यक्ष कुमारी साक्षी तिगाडे म्हणाली की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या बाल साहित्यातून उद़याचे कवी व लेखक घडतील. समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतील. कला कोणतीही असू द़या, तीला बाहेर येऊ द़या ती तुम्हाला मान मिळवून देईल. संमेलनातून खूप काही शिकायला मिळाले, असेही तीने सांगितले. शेतकऱ्याचे सत्य ही कविता तीने सादर केली. प्रस्तावना डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी केले. सुत्रसंचालन हणमंत पडवळ व श्रीमती संगिता वाकुरे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी रोहिनी कुंभार यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.