Monday, February 4, 2019

महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करताना इतर महिलांना प्रेरणा देणे आवश्यक - आमदार राणाजगजितसिंह पाटील






उस्‍मानाबाद, दि.4:- महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करताना इतर महिलांना प्रेरणा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आद्या हिरकणी महोत्सव व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2019  कार्यक्रमाचे आयोजन लेडीज क्लब, उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,जिल्हा परिषद सदस्य सौ.अस्मिता कांबळे, पंचायत समिती लोहारा सभापती अश्विनी पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती श्याम जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख,  जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) डॉ.बलवीर मुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मॉसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आमदार श्री.पाटील म्हणाले, आपण आपल्या यशानंतर इतरांनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच ग्रामीण भागात कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी बचत गटांच्या महिलांनी संघटीतरित्या अन्यायाच्या विरोद्धात उभे राहायला पाहिजे. त्याचबरोबर गावपातळीवर दारुबंदी व व्यसनमुक्तीसाठी महिलांनी प्रयत्न केले पाहीजेत, त्यासाठी आमचे सदैव सहकार्य राहील.
 जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंची विक्री मोठ मोठया शहरात होत आहे ही अभिमानाची बाब आहे. बचत गटांच्या उत्पादन केलेल्या वस्तूंचा एक ब्रँड तयार होणे अपेक्षीत आहे.त्यासाठी सदर वस्तुंच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार व्हावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी, महिलांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, ग्रामीण भागातील कुटुंबाचा अर्धा खर्च कर्मकांडासाठी होतो, यासाठी अंद्धश्रद्धेला बगल देऊन महिलानी बचत गटांच्या माध्यमातून सक्षम होऊन कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे ही विशेष लक्ष दिले पाहीजे, त्यासाठी त्यांनी शौच्छालयाचा नियमित वापर केला पाहीजे.
डॉ.कोलते यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात 11 हजार स्वयंसहाय्यता गटांची बांधणी पूर्ण झाली असून त्यात एक लाख 30 हजार कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबातील महिला बचत गटाची सदस्य होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, सहा ते सात हजार गटांना आर्थिक सहाय्य करण्यात आले असून उर्वरीत गटांनाही सहकार्य करुन सक्रिय कशी होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना बँकाकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
यावेळी प्रास्ताविक करताना डॉ.मुंडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनन्नोती अभियान एक आशेचा आधार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीला अभियान सुरु झाले तेव्हा फक्त तीन तालुक्यात हे अभियान राबविण्यात आले, आता संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत महिलांना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देणे, बँकेचे कर्ज मिळवून देणे आदी कामे करण्यात येतात. स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना व मालाला बाजारपेठ  मिळावून देण्याचे काम करण्यात येत आहे.
यावेळी जिल्ह्यातील ज्या गटांनी अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेले आहे आशा गटांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावंलंबन पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले, यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातून प्रथम प्रज्ञाशील महिला स्वयंसहाय्यता गट (उपळा), द्वितीय स्वाभिमानी महिला स्वयंसहाय्यता गट (देवळाली) तर तृतीय चांदणी महिला स्वयंसहाय्यता गट (वाघोली), उमरगा तालुक्यातून प्रथम महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता गट (नाईक नगर), द्वितीय महाराष्ट्र नारी  महिला स्वयंसहाय्यता गट (नाईचाकूर) तर तृतीय पुरुषोत्तम महिला स्वयंसहाय्यता गट (नाईचाकूर), कळंब तालुक्यातून प्रथम साई महिला स्वयंसहाय्यता गट (कन्हेरवाडी), द्वितीय महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता गट (वाकडी केज), तृतीय शिवपार्वती महिला स्वयंसहाय्यता गट (शिराढोण), परंडा तालुक्यातून प्रथम जय तुळजाभवानी महिला स्वयंसहाय्यता गट (इंगोंदा), द्वितीय जीवदानी माता महिला स्वयंसहाय्यता गट (लोणी) तृतीय सावित्रीबाई महिला स्वयंसहाय्यता गट (डोंजा), वाशी तालुक्यातून माऊली महिला स्वयंसहाय्यता गट (दसमेगाव), द्वितीय ग्रामसेवा महिला स्वयंसहाय्यता गट (लाखन गाव), तृतीय मोहटा देवी महिला स्वयंसहाय्यता गट (सेलू), लोहारा तालुक्यातून प्रथम सिध्दार्थ महिला स्वयंसहाय्यता गट (धानुरी), द्वितीय लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता गट (धानुरी), तृतीय रेणूका महिला स्वयंसहाय्यता गट (हिप्परगा), भूम तालुक्यातून राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय महिला स्वयंसहाय्यता गट (आंबी), द्वितीय राधिका महिला स्वयंसहाय्यता गट (सोनेवाडी), तृतीय श्री. शिवशक्ती महिला स्वयंसहाय्यता गट (नागेवाडी), तुळजापूर तालुक्यातून प्रथम क्रांती महिला स्वयंसहाय्यता गट (सांगवी का), द्वितीय वसुंधरा महिला स्वयंसहाय्यता गट (पिंपळा बुद्रुक) तर तृतीय ज्योती महिला स्वयंसहाय्यता गट (तीर्थ बुद्रुक) ला देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता कांबळे, बचत गटाच्या सदस्य पाकीजा शेख, रुपाली श्न्दिे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमाकांत गायकवाड यांनी केले. या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूचे 107 स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
                                                        *****