Thursday, July 26, 2018

स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण ग्रामीण-2018 अंतर्गत जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये होणार सर्व्‍हेक्षण



उस्मानाबाद.दि.25:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दिनांक 13 जुलै 2018 रोजी “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्‍यांना तसेच जिल्ह्यांना  राष्‍ट्रीयस्‍तरावरुन दिनांक 2 आक्टोबर या गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व्‍हेक्षणासाठी राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासनाकडून रॅन्‍डमली पध्‍दतीने केली जाणार असल्‍याने जिल्‍हयातील सर्वच ग्रामपंचायतींना सदर सर्व्‍हेक्षणासाठी सज्‍ज रहावे लागणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली आहे.
                केंद्र सरकार कडून निवडलेल्‍या संस्थेकडून पहिल्‍या टप्‍यामध्‍ये सार्वजनिक ठिकाणाचे थेट निरिक्षण होणार आहे. यामध्‍ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सर्व प्रार्थना स्‍थळे/मंदिर ठिकाण, यात्रास्‍थळे, बाजाराची ठिकाणे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध  सार्वजनिक ठिकाणे इत्यादी स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. तसेच या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील नागरीकांच्‍या स्वच्छतेबाबतच्‍या व स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) बाबतच्‍या प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रियाही घेण्‍यात येणार आहेत.
                स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 अंतर्गत गावस्‍तरावर गावचे सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही,  ग्रामपंचायत सदस्‍य, निगराणी समिती सदस्‍य, अंगणवाडी कार्यकर्त्‍या, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल.
अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी
                उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसीत केली आहे.  या माध्यामातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती,  30 टक्के प्रत्यक्ष पाहणी  केली जाईल.
  आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये “स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण” अंतर्गत  स्वच्छतेसाठी निवडलेले गावे,  हगणदारी मुक्त गावांची स्थिती,  हगणदारी मुक्त गावांची पडताळणी,  जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली  जाईल.
प्रत्यक्ष पाहणी माहितीतंर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता यासर्व बाबींचा  विचार केला जाईल.
प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमातंर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती  गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छताग्रही खुली बैठक, व्यक्तीगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नावीन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृकता, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने  वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापन याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांनी शेळीपालन प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद



उस्मानाबाद.दि.19:- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेस जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी भेट देऊन शेळीपालन प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
यावेळी प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षक श्री विकास गोफणे, जीवनज्योती सरपाळे, कलीम शेख, श्री. नंदकिशोर सुरवसे, श्री. गणेश गवळी, अवधूत पौळ आदींची उपस्थिती होती.  
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या जिल्ह्याची ओळख सांगणारी उस्मानाबादी प्रजातीची शेळी घराघरांमध्ये वाढवा व आपल्या जिल्ह्याची ओळख इतरांना सकारात्मक रीतीने कृतीतून दाखवा, असे आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त करत असताना प्रशिक्षण संस्थेतून आम्हाला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन, आत्मविश्वास, महामंडळाची माहिती, बँकेच्या विविध योजना, शेळीपालन कसे करावे, चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेळ्यांचा विमा, लसीकरण, गोठा बांधणी याचबरोबर बँकेचे कर्ज कसे घ्यावे व त्याची परतफेड कशी करावी, कर्जासाठी लागणारी कागदपत्र याविषयी माहिती मिळाली, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक श्री. विकास गोफणे यांनी केले तर आभार जीवन ज्योती सरपाळे यांनी मानले. यावेळी 24 प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.

Wednesday, July 18, 2018

“मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ




उस्मानाबाद.दि.16:- विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत अति विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते सोमवार दि. 16 जून 2018 रोजी बाळास लस देऊन करण्यात आला.
                यावेळी सरपंच श्रीमती. महानंदाताई चौगुले, उपसरपंच जयसिंह पाटील, जिल्हा प्रजनन व बाल विकास अधिकारी डॉ. एस.डी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.एम.मेंढेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरी, प्रशांत वीर, ग्रामपंचायत सदस्य अनंत खोबर, श्रीमती. पपिता कुदळे, सुनिल माळी, दादासाहेब गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किरण गरड, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक आप्पासाहेब सोनवणे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (प्र)अर्जुन लाकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरोदर माता व बालकासाठी दि. 16 जून 2018 पासून विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत अति विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम जिल्ह्यातील 488 गावामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांच्या लसीकरणासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत नियमित लसीकरणास पात्र असलेली बालके, नुकतीच जन्मलेली बालके आणि धनुर्वाताचे इंजेक्शन न घेतलेल्या गरोदर माता यांच्यासाठी ही अति विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. 16 ते 23 जुलै 2018 मध्ये पहिला टप्पा, दि. 13 ते 20 ऑगस्ट 2018 दुसरा टप्पा तर दि. 10 ते 17 सप्टेंबर 2018 मध्ये तिसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील 11 हजार 679 बालके व 1 हजार 704 गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार असून उर्ववरीत गावामध्ये टप्प्याटप्प्याने  ही मोहिम राबवून शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.
                लसीकरण कालावधीत नजीकच्या आरोग्य केंद्रात याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी केले.
                या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.16:- प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, कारण यशाचे पहिले पाऊल म्हणजे ध्येय निश्चित करणे होय, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले
उस्मानाबाद तालुक्यातील माध्यमिक प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत विशेष प्राविण्य संपादीत केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 जुलै 2018 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती सौ. अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, जिल्हा परिषद सदस्य उषाताई यरकळ, मदन बारकुल, दत्तात्रय देवळकर, अभिमन्यू शितोळे, पंचायत समिती सदस्य श्रीमती. अर्चनाताई शिन्दे, श्रीमती.चांदणे, कुसुमताई इंगळे, विराट पाटील, संजय लोखंडे, मोहन साबळे, अशिष नाईकल, बाजीराव पवार, प्रदिप शिन्दे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षणाधिकारी श्री. मोकाशे, नितीन शेरखाने  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना आमदार श्री. पाटील म्हणाले की, शिक्षणात दहावी, बारावीचा टप्पा म्हत्वाचा असून यानंतर पुढे काय करायचे यासाठी आई वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन बहुमुल्यअसल्याने त्यानुसार ध्येय निश्चित करावे. जीवनात कितीही मोठे झाले तरी आई-वडीलांना विसरु नये. स्पर्धेच्या युगात मुलांनी यश संपादन करण्यावर लक्ष दिले पाहिजे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवले पाहिजे, असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असून 210 शाळांना डिजिटल बोर्ड , प्रत्येक वर्गात टि.व्ही.संच बसविण्यात येणार असून चांगल्या शिक्षकांचे जिल्ह्यातील अन्य शाळात या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बुट, मोजे देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून विशेष तरतूद करण्यात आली आहे.
                विद्यार्थ्यांनी आपली क्षमता, आवड निवड ओळखून पुढचा मार्ग निवडला पाहिजे, जिल्हा परिषद शाळांची शंभर टक्के गुणवत्ता कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी सांगितले.
                तालुक्यातील इयत्ता 12 वीच्या 8 विद्यार्थ्यांचा तर इयत्ता 10 वीच्या 265 विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री.मोकासे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री.लाटे, सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

Wednesday, July 11, 2018

सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या वाढीव कुटूंबाचे शौचालयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण



उस्मानाबाद.दि.11:- स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या वाढीव कुटूंबाचे शौचालयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेच्या वतीने माहिती संकलनाकरीता प्रपत्र (अ) व (ब) पंचायत समिती व गाव पातळीवर उपलब्ध करुन देण्यात आलेले ओहत. सदरील सर्वेक्षण हे स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने अंतिम सर्वेक्षण असल्याने यात सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अचूक व वेळेत माहिती देणे करीता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.
            स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2012 मध्ये शौचालय असलेल्या व नसलेल्या कुटूंबाचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आलेले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे उस्मानाबाद जिल्हा हा दि. 30 डिसेंबर 2017 रोजी हागणदारी मुक्त केला आहे. तथापी 2012 च्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या कुटूंबाची नोंद शासन दप्तरी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शासनाने सर्वेक्षणाव्यतिरिक्त वाढलेल्या कुटूंबांची माहिती संकलित करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत जि.प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यात सर्व प्रथमत: या बाबत महाराष्ट्र शासनाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव कुटूंबाच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. त्या प्रमाणे दिनांक 18 जून 2018 रोजी सर्व गट विकास अधिकारी यांना पत्रान्वये प्रपत्र (अ) व (ब) वाढीव कुटूंबाची माहिती देण्याकरीता सूचित करण्यात आलेले आहे.
            यात शौचालय असलेल्या व नसलेल्या कुटूंबाची माहिती, सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणामध्ये शौचालय नसताना आहे असे नमुद झालेल्या कुटूंबाची माहिती, अल्प-भू-धारक किंवा भूमिहीन असताना बहु-भू-धारक अशी नोंद झालेल्या कुटूंबांची यादी संकलित केली जाणार आहे.
******


Friday, July 6, 2018

हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीची स्वयंसेवी संस्थेमार्फत तपासणीमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पात्र उस्मानाबाद मराठवाडयातील पहिला जिल्हा



उस्मानाबाद.दि.6:- सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणाप्रमाणे स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी  उस्मानाबाद जिल्हा हा 100 टक्के हागणदारी मुक्त घोषीत करण्यात आला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व हागणदारी मुक्त ग्रामपंचायतींची तपासणी शासन नियुक्त स्वयंसेवी संस्थेमार्फत टप्पा-2 अंतर्गत पुर्ण करण्यात आली असून सदरील तपासणीमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या पात्र ठरलेल्या आहेत. या उपक्रमामुळे उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाड्यातील 100 टक्के ग्रामपंचायती तपासणी करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे.
                स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याने हागणदारीमुक्त ग्रामपंचायती होण्याकरीता विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविून सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा दि. 30 डिसेंबर 2017 रोजी हागणदारी मुक्त केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची तपासणी यशस्वीरित्या पुर्ण करणे हे आव्हानात्मक कार्य पुर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने दि. 23 जून 2018 रोजी यशस्वीरित्या पुर्ण केलेली आहे.
                महाराष्ट्र शासन नियुक्त राज्यातील विविध जिल्ह्यातील 8 (आठ) मुख्य संसाधन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणी दि. 22 जून 2018 रोजी संपन्न झालेली असून या तपासणीमध्ये सर्व ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या उपक्रमात उस्मानाबाद जिल्ह्याने मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे काम यशस्वीरित्या पुर्ण करण्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी वारंवार बैठका व सुयोग्य नियोजनाच्या आधारे हे उद्दिष्ठ साध्य केले आहे. या कामी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.स्व) श्री मधुकर देशमुख व त्यांचे सर्व कर्मचारी, सर्व गट विकास अधिकारी व त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांनी सदरील तपासणी यशस्वी होण्याकरीता विशेष प्रयत्न केलेले आहेत.
                सन 2012 च्या सर्वेप्रमाणे हागणदारी मुक्त करणेकामी व त्या प्रमाणे सर्व गावे संस्थेकडून तपासून घेणे कामी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांना सोबत घेऊन  जिल्हा परिषद अध्यक्ष  नेताजी  पाटील, उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी  मोहीम काळात व त्यापुढे सतत प्रयत्न केले आहेत. या कामाबद्दल त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ, पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन उर्वरीत सर्वेबाहेरील कामाबाबत मार्गदर्शन केले व सूचना दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्ह्यास 30 कोटी 83 लाख रुपये निधी मंजूर



उस्मानाबाद.दि.6:- ग्रामीण भागातील आरोग्य विभागाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 30 कोटी 83 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असून हा निधी मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
                राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्यावत नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी मंजूर झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी समुद्रवाणी (ता.उस्मानाबाद) येथे चार कोटी 68 लाख 62 हजार रुपये,  सोनारी (ता.परंडा) येथे पाच कोटी 60 लाख 47 हजार रुपये,  कोंड (ता.उस्मानाबाद) येथे चार कोटी 95 लाख रुपये, येरमाळा (ता.कळंब) येथे चार कोटी 95 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी अद्यावत निवासस्थानासाठी  मुळज(ता.उमरगा) येथे एक कोटी 78 लाख 93 हजार रुपये, सलगरा(ता.तुळजापूर) येथे दोन कोटी 16 लाख 21 हजार रुपये, ईट(ता.भुम) येथे एक कोटी 72 लाख 26 हजार रुपये, पाडोळी(ता.उस्मानाबाद) येथे दोन कोटी 16 लाख 21 हजार रुपये तर  ढोकी (ता.उस्मानाबाद) येथे दोन कोटी 80 लाख 37 हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळण्यास मोठी मदत होणार आहे.   
                                                                        *****

जिल्हा परिषदेमार्फत विशेष गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार - जिल्हा परिषद उपाध्यक्षा.सौ अर्चनाताई पाटील






उस्मानाबाद.दि.4:- स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत या वर्षी पासून विशेष गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील यांनी  आज केले .
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवार दि. 4 जुलै 2018 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील  बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, शिक्षणाधिकारी (प्रा) शिवाजी जाधव, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) सत्यवान सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, उध्दव साळवी, श्रीमती. उषाताई यरकळ, श्रीमती. अस्मिता कांबळे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार, गट शिक्षणाधिरी सर्वश्री. कल्याण सोनवणे, श्री. मोकाशे, श्रीमती. यमुनाबाई देशमुख, श्री. बनसोडे, श्रीमती. सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, वाढत्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत विशेष गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार असून यासाठी प्रत्येक शाळेचे वर्षभराचे अभ्यासक्रमाचे नियोजन केले जाणार आहे, त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला वेळापत्रक तयार करुन दिले जाणार असून त्याप्रमाणे शिकवण्यास सुरवात करण्यात येणार आहे. प्रत्येक पाठ शिकवण्याचा झाला की, त्यावर अधारित प्रश्न सोडवून घेतले जाणार आहेत. यासाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्यात येणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरते ग्रंथालय दोन महिण्यात सुरु करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना 10 वी, 12 वी नंतर पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन व्हावे म्हणुन त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन मेळावा घेण्यात येणार आहे, असे ही यावेळी सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेमध्ये अनुभवी शिक्षक असल्याने जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढत असून यावर्षी गतवर्षी पेक्षा चांगले यश जिल्हा परिषद शाळेनी मिळविले आहे. यावर्षी पासून जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना याचा क्रीडा गुणासाठी फायदा होईल. मायेची व कौतूकाची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडून इतर विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के प्रगत करणे, अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर आणणे, यासह शिक्षण विभागाच्या सर्व योजनांना बळकटी देवून गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी  श्री. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, उषाताई यरकळ, अस्मिाता कांबळे आदींनी  मनोगत व्यक्त केले.  यावेळी  जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 10 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 45 विद्यार्थ्यांचा, त्याचबरोबर शंभर टक्के निकाल असलेल्या तीन शाळेचा व 95 ते 100 टक्के पर्यंत निकाल असलेल्या तीन शाळेच्या मुख्याध्यापकांचा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या 32 विद्यार्थ्यांचा असे एकुण 83 सत्कार स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्रा) शिवाजी जाधव, आभार उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार यांनी मानले तर सुत्रसंचलन हनुमंत पडवळ यांनी केले. विस्तार अधिकारी श्री.लोमटे, श्री.घोलप, श्री.यरमुनवाड, श्री.वाघमारे, श्रीमती.कुंभार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी  विशेष परिश्रम घेतले.  यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
******