Thursday, July 26, 2018

स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण ग्रामीण-2018 अंतर्गत जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये होणार सर्व्‍हेक्षण



उस्मानाबाद.दि.25:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दिनांक 13 जुलै 2018 रोजी “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्‍यांना तसेच जिल्ह्यांना  राष्‍ट्रीयस्‍तरावरुन दिनांक 2 आक्टोबर या गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व्‍हेक्षणासाठी राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासनाकडून रॅन्‍डमली पध्‍दतीने केली जाणार असल्‍याने जिल्‍हयातील सर्वच ग्रामपंचायतींना सदर सर्व्‍हेक्षणासाठी सज्‍ज रहावे लागणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली आहे.
                केंद्र सरकार कडून निवडलेल्‍या संस्थेकडून पहिल्‍या टप्‍यामध्‍ये सार्वजनिक ठिकाणाचे थेट निरिक्षण होणार आहे. यामध्‍ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सर्व प्रार्थना स्‍थळे/मंदिर ठिकाण, यात्रास्‍थळे, बाजाराची ठिकाणे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध  सार्वजनिक ठिकाणे इत्यादी स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. तसेच या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील नागरीकांच्‍या स्वच्छतेबाबतच्‍या व स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) बाबतच्‍या प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रियाही घेण्‍यात येणार आहेत.
                स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 अंतर्गत गावस्‍तरावर गावचे सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही,  ग्रामपंचायत सदस्‍य, निगराणी समिती सदस्‍य, अंगणवाडी कार्यकर्त्‍या, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल.
अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी
                उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसीत केली आहे.  या माध्यामातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती,  30 टक्के प्रत्यक्ष पाहणी  केली जाईल.
  आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये “स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण” अंतर्गत  स्वच्छतेसाठी निवडलेले गावे,  हगणदारी मुक्त गावांची स्थिती,  हगणदारी मुक्त गावांची पडताळणी,  जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली  जाईल.
प्रत्यक्ष पाहणी माहितीतंर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता यासर्व बाबींचा  विचार केला जाईल.
प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमातंर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती  गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छताग्रही खुली बैठक, व्यक्तीगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नावीन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृकता, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने  वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापन याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.

No comments:

Post a Comment