Sunday, December 23, 2018

ग्रंथदिंडीने वेधले उस्मानाबादकरांचे लक्ष




उस्मानाबाद, दि.22:-  पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे कन्या प्रशाला ते वैराग्यमहामेरू संत गोरोबाकाका साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत महापुरुषांच्या वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात आला. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा तथा स्वागताध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
टाळ, मृदंगाचा गजर करणारे पथक, विविध वेशभूषातील विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. या शिवाय विद्यार्थ्यांनी या दिंडीत विविध जनजागृतीपर घोषणा देत सामाजिक संदेश देण्याचे काम केले. यावेळी दिंडीत संतपरंपरा, उस्मानाबाद जिल्हा दर्शन, एकता बल, स्वच्छता मिशन, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण संस्कृती, आदी संदेश देणारे चित्ररथ सामिल करण्यात आले होते. ही दिंडी जिल्हा परिषद कन्या शाळेपासून संत गाडगेबाबा चौक, काळा मारूती चौक, ताजमहल टॉकीज, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे संमेलनस्थळी आली. यावेळी तेथे दिंडीचा समारेाप करण्यात आला.

No comments:

Post a Comment