Tuesday, September 25, 2018

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



उस्मानाबाद.दि.25:- जिल्हा परिषदेमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर शेटे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.कवडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, उपशिक्षणाधिकारी श्रीमती.रोहीणी कुंभार आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                             ******

Friday, September 7, 2018

समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात -आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.5:- गावच्या विकासासाठी एकजूट व लोकसहभाग म्हत्त्वाचा असल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. 
 शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात बुधवार दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पंचायत समिती सभापती (उस्मानाबाद) बालाजी गावडे, पंचायत समिती सभापती (कळंब) दत्तात्रय साळूंके, पंचायत समिती सभापती (वाशी) श्रीमती. भाग्यश्री हाके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते, उध्दव साळवी, दत्तात्रय देवळकर, वैभव मुंढे, मदन बारकुल, महेंद्र धुरगुडे, सुरेश कोरे, उषाताई यरकळ, अस्मिता कांबळे, जयश्री खंडागळे, सुनिता जाधव, प्रविण खटाळ, शिक्षणाधिकारी (प्रा.) कलिमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी (मा) शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. शिक्षकांनी मोठया प्रमाणात लोकसहभागातून शाळा सुधारल्या आहेत त्याच बरोबर गावाचा देखील कायापालट केला आहे. त्यामुळे प्रत्येक कामात शिक्षकांची साथ महत्त्वाची आहे. लोकसहभाग गावात वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सीएसआरच्या माध्यमातून शिक्षणासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, आपण केलेल्या कामाचे मुल्यमापण व्हावे, कौतूक व्हावे म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून काम करावे, अशी आशा जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी व्यक्त करुन  शिक्षकांनी केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील बोलतांना म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी मोठया प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेस मधून निधीची तरतूदही करण्यात येत आहेत. डिजिटल शाळा, आरओ प्लाँट, शाळेसाठी गॅस सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, बुट, सॉक्स आदी उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वर्षीपेक्षा जिल्हा परिषद शाळांची यावर्षी 12 हजार विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेली आहे. त्याचबरोबर क्वशन बँक तयार करुन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. यावर्षी पासून विद्यार्थ्यांसाठी 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील थकीत वीज बिलासाठी ही जि.प.सेस मधून 89 लाख रुपयांची तरतूद आगामी जि.प.सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात येईल. शिक्षण विभागात महाराष्ट्रात अव्वलस्थानी जिल्हा येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.  
कांबळे अरुण नरहरी, फुलमामडी तौफी कुलआलम नुरुलअलीन, स्वामी रंजना कमलाकर, गायकवाड कमलाकर शामराव, खोसे उमेश रघुनाथ, देशमाने विजयकुमार गुरुनाथ, कांबळे तानाजी आप्पाराव, कांबळे सुब्राव गोरोबा, पखाले नामदेव भागवत, गादेकर विनोद भागवत, वाघोलीकर अभय शंकरराव, भोसले विजयकुमार बाबासाहेब, कांबळे तात्याबा बाबा, अंधारे अमोल रावसाहेब, बन बळीराम आदी 15 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कारांने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अमोल अंधारे, उमेश खोसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कलिमोद्दिन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी कुंभार यांनी मानले.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                 
******                       
 

Tuesday, August 28, 2018

जिल्हा परिषदेमध्ये सदभावना दिन साजरा



उस्मानाबाद.दि.20:- जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. कलीमोदीन शेख, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सय्यद मुजाहिद हुशेन आदीसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी (मा) संतोष माळी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदभावना प्रतिज्ञा दिली.    

Thursday, July 26, 2018

स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण ग्रामीण-2018 अंतर्गत जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये होणार सर्व्‍हेक्षण



उस्मानाबाद.दि.25:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दिनांक 13 जुलै 2018 रोजी “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्‍यांना तसेच जिल्ह्यांना  राष्‍ट्रीयस्‍तरावरुन दिनांक 2 आक्टोबर या गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व्‍हेक्षणासाठी राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासनाकडून रॅन्‍डमली पध्‍दतीने केली जाणार असल्‍याने जिल्‍हयातील सर्वच ग्रामपंचायतींना सदर सर्व्‍हेक्षणासाठी सज्‍ज रहावे लागणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली आहे.
                केंद्र सरकार कडून निवडलेल्‍या संस्थेकडून पहिल्‍या टप्‍यामध्‍ये सार्वजनिक ठिकाणाचे थेट निरिक्षण होणार आहे. यामध्‍ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सर्व प्रार्थना स्‍थळे/मंदिर ठिकाण, यात्रास्‍थळे, बाजाराची ठिकाणे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध  सार्वजनिक ठिकाणे इत्यादी स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. तसेच या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील नागरीकांच्‍या स्वच्छतेबाबतच्‍या व स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) बाबतच्‍या प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रियाही घेण्‍यात येणार आहेत.
                स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 अंतर्गत गावस्‍तरावर गावचे सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही,  ग्रामपंचायत सदस्‍य, निगराणी समिती सदस्‍य, अंगणवाडी कार्यकर्त्‍या, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल.
अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी
                उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसीत केली आहे.  या माध्यामातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती,  30 टक्के प्रत्यक्ष पाहणी  केली जाईल.
  आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये “स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण” अंतर्गत  स्वच्छतेसाठी निवडलेले गावे,  हगणदारी मुक्त गावांची स्थिती,  हगणदारी मुक्त गावांची पडताळणी,  जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली  जाईल.
प्रत्यक्ष पाहणी माहितीतंर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता यासर्व बाबींचा  विचार केला जाईल.
प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमातंर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती  गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छताग्रही खुली बैठक, व्यक्तीगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नावीन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृकता, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने  वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापन याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांनी शेळीपालन प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद



उस्मानाबाद.दि.19:- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेस जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी भेट देऊन शेळीपालन प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
यावेळी प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षक श्री विकास गोफणे, जीवनज्योती सरपाळे, कलीम शेख, श्री. नंदकिशोर सुरवसे, श्री. गणेश गवळी, अवधूत पौळ आदींची उपस्थिती होती.  
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या जिल्ह्याची ओळख सांगणारी उस्मानाबादी प्रजातीची शेळी घराघरांमध्ये वाढवा व आपल्या जिल्ह्याची ओळख इतरांना सकारात्मक रीतीने कृतीतून दाखवा, असे आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त करत असताना प्रशिक्षण संस्थेतून आम्हाला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन, आत्मविश्वास, महामंडळाची माहिती, बँकेच्या विविध योजना, शेळीपालन कसे करावे, चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेळ्यांचा विमा, लसीकरण, गोठा बांधणी याचबरोबर बँकेचे कर्ज कसे घ्यावे व त्याची परतफेड कशी करावी, कर्जासाठी लागणारी कागदपत्र याविषयी माहिती मिळाली, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक श्री. विकास गोफणे यांनी केले तर आभार जीवन ज्योती सरपाळे यांनी मानले. यावेळी 24 प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.

Wednesday, July 18, 2018

“मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ




उस्मानाबाद.दि.16:- विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत “अति विशेष मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण मोहिमेचा उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते सोमवार दि. 16 जून 2018 रोजी बाळास लस देऊन करण्यात आला.
                यावेळी सरपंच श्रीमती. महानंदाताई चौगुले, उपसरपंच जयसिंह पाटील, जिल्हा प्रजनन व बाल विकास अधिकारी डॉ. एस.डी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.एम.मेंढेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरी, प्रशांत वीर, ग्रामपंचायत सदस्य अनंत खोबर, श्रीमती. पपिता कुदळे, सुनिल माळी, दादासाहेब गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किरण गरड, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक आप्पासाहेब सोनवणे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (प्र)अर्जुन लाकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरोदर माता व बालकासाठी दि. 16 जून 2018 पासून “विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत अति विशेष मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण मोहिम जिल्ह्यातील 488 गावामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांच्या लसीकरणासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत नियमित लसीकरणास पात्र असलेली बालके, नुकतीच जन्मलेली बालके आणि धनुर्वाताचे इंजेक्शन न घेतलेल्या गरोदर माता यांच्यासाठी ही “अति विशेष मिशन इंद्रधनुष्य” मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. 16 ते 23 जुलै 2018 मध्ये पहिला टप्पा, दि. 13 ते 20 ऑगस्ट 2018 दुसरा टप्पा तर दि. 10 ते 17 सप्टेंबर 2018 मध्ये तिसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील 11 हजार 679 बालके व 1 हजार 704 गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार असून उर्ववरीत गावामध्ये टप्प्याटप्प्याने  ही मोहिम राबवून शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.
                लसीकरण कालावधीत नजीकच्या आरोग्य केंद्रात याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी केले.
                या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.16:- प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, कारण यशाचे पहिले पाऊल म्हणजे ध्येय निश्चित करणे होय, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले
उस्मानाबाद तालुक्यातील माध्यमिक प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत विशेष प्राविण्य संपादीत केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 जुलै 2018 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती सौ. अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, जिल्हा परिषद सदस्य उषाताई यरकळ, मदन बारकुल, दत्तात्रय देवळकर, अभिमन्यू शितोळे, पंचायत समिती सदस्य श्रीमती. अर्चनाताई शिन्दे, श्रीमती.चांदणे, कुसुमताई इंगळे, विराट पाटील, संजय लोखंडे, मोहन साबळे, अशिष नाईकल, बाजीराव पवार, प्रदिप शिन्दे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षणाधिकारी श्री. मोकाशे, नितीन शेरखाने  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना आमदार श्री. पाटील म्हणाले की, शिक्षणात दहावी, बारावीचा टप्पा म्हत्वाचा असून यानंतर पुढे काय करायचे यासाठी आई वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन बहुमुल्यअसल्याने त्यानुसार ध्येय निश्चित करावे. जीवनात कितीही मोठे झाले तरी आई-वडीलांना विसरु नये. स्पर्धेच्या युगात मुलांनी यश संपादन करण्यावर लक्ष दिले पाहिजे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवले पाहिजे, असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असून 210 शाळांना डिजिटल बोर्ड , प्रत्येक वर्गात टि.व्ही.संच बसविण्यात येणार असून चांगल्या शिक्षकांचे जिल्ह्यातील अन्य शाळात या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बुट, मोजे देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून विशेष तरतूद करण्यात आली आहे.
                विद्यार्थ्यांनी आपली क्षमता, आवड निवड ओळखून पुढचा मार्ग निवडला पाहिजे, जिल्हा परिषद शाळांची शंभर टक्के गुणवत्ता कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी सांगितले.
                तालुक्यातील इयत्ता 12 वीच्या 8 विद्यार्थ्यांचा तर इयत्ता 10 वीच्या 265 विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री.मोकासे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री.लाटे, सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****